नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा परिसरात हुळहुळे वस्तीवर सात वाजेच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकून मायलेकांना जबर मारहाण केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील पाच तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला. या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. सिन्नरच्या नांदूरशिंगोटे येथे देखील सशस्त्र दरोड्याची घटना घडली होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याची उकल अनेक दिवसांनंतर केली. मात्र पुन्हा एकदा वडगाव पिंगळा येथील मळ्यात दरोड्याची घटना घडली.
हुळहुळे वस्तीवर दरोडा टाकला त्यावेळेस कुटुंबातील प्रमुख हे भाजीपाला विक्रीसाठी मार्केटला गेले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हुळहुळे कुटुंबातील राहुल आणि त्याची आई दोघेच घरात होते. अशातच कोयते चाकू हातात घेऊन सहा सात दरोडेखोर घरात घुसले. ओरडण्याचा आतच त्यांनी सर्व हातपाय सेलोटेपने बांधून टाकले. त्यानंतर या दरोडेखोरांनी कपाटातील पाच तोळे सोन्यासह २५ ते तीस हजारांची रक्कम चोरून नेली. या दरोडयात कोयते आणि चाकू हातात असलेले दरोडेखोर हिंदी बोलत होते.