नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. संतप्त जावयाने आपल्या सासरी जाऊन पत्नी, मुलगी आणि सासूवर थेट विळ्याने जोरदार वार केले. त्यात सासूचा मृत्यू झाला असून मुलगी आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने जावयाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन महादू पारधी (वय ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी इंदूबाई किसन पारधी (वय ३६) ही आपली मुलगी माधुरी किसन पारधी (वय १२) हिला घेऊन माहेरी आली होती. त्याचवेळी किसन हा तातडीने सासरी आला. पत्नीला घरी (सासरी) येण्यास सांगितले. पत्नीने नकार देताच त्याने तिच्यासोबसृत भांडण केले. दोघांमध्ये वादविवाद सुरू असतानाच किसनने घरात पडलेला विळा हाती घेऊन पत्नी इंदूबाईवर सपासप वार सुरू केले. ही बाब सासूबाई (कमळाबाई सोमा भुतांबरे, वय ५५) यांनी जावयाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जावयाने सासूवरही हल्ला चढवला. सासूच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी आणि मुलगी हे गंभीर जखमी झाले आहेत.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या झारवड या गावी ही घटना घडली आहे. किसन पारधीचे गाव हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते हे आहे. तर, त्याचे सासर हे झारवड येथील आहे. पत्नी इंदूबाईने दिलेल्या माहितीनुसार किसनला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे तो दररोज दारु पिऊन पत्नीला मारहाण करीत असे. या त्रासाला इंदूबाई ही कंटाळली होती. त्यामुळेच ती आपल्या १२ वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी आली होती. याचा राग किसनला आला. त्यामुळेच किसनने थेट सासर गाठले आणि तेथे हा गुन्हा घडला.
किसन हा संतापाच्या भरात वार करीत असल्याने सासू, पत्नी आणि मुलगी या तिन्ही जणी जोरजोरात ओरडत होते. ही बाब परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने घराकडे धाव घेतले. तेथील हे भीषण दृष्य पाहून ग्रामस्थही हादरले. काही जणांनी शिताफीने किसनला पकडले. तर, मृत कमळाबाईंसह इंदूबाई आणि माधुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे कमळाबाई यांना मृत घोषित करण्यात आले. तर, पुढील उपचारासाठी इंदूबाई आणि माधुरी या दोन्ही जखमी मायलेकींवर नाशिक शहरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये किसन विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.