मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भ्रमणध्वनीसाठी मनोरा (टॉवर) उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याचे आमीष देणारी मोठी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्हाला कुणी ऑफर देत असेल तर सावधान. यात तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. यासंदर्भात केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे.
भ्रमणध्वनीसाठी मनोरा (टॉवर) उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याची बतावणी करणाऱ्या व्यक्ती, यंत्रणा आणि कंपन्यांपासून जनतेने सावध राहावे, अशी सूचना दूरसंवाद विभागाने केली आहे. भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्याकरता जागा भाडेतत्त्वावर देण्याबाबत व्यवहारात दूरसंवाद विभाग किंवा ट्राय अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसतो. तसेच, मनोरा उभारण्यासाठी दूरसंवाद विभाग, ट्राय किंवा त्यांचे अधिकारी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देत नाहीत, असे दूरसंवाद विभागाने स्पष्ट केले आहे.
भ्रमणध्वनीसाठी मनोरा उभारण्यात होणाऱ्या घोटाळ्यांपासून जनतेला सावध करण्यासाठी व अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी दूरसंवाद विभागाने सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. कोणताही दूरसंवाद सेवा दाता भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्यासाठी आगाऊ रक्कमेची मागणी करीत नाही. भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्यापूर्वीच कोणत्याही स्वरुपात आगाऊ रकमेची मागणी करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांच्या पात्रतादर्शक बाबींची, जनतेने अत्यंत जागरूक राहून व्यवस्थित चौकशी करावी. मनोरा उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याआधी दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध टी.एस.पी./आय.पी.-1 ची वैधता तपासून घ्यावी.
अद्ययावत यादी खालील लिंकवर पहा
https://dot.gov.in/access-services/list-access-service-licences-issued
https://dot.gov.in/infrastructure-provider
अशा प्रकारच्या घोटाळ्यांची येथे करा तक्रार
अशा प्रकारचा घोटाळा लक्षात आल्यास, संबंधित प्रसंगाची स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी. दूरसंवाद विभागाच्या स्थानिक क्षेत्रीय कक्षाशी खालील पत्त्यावर संपर्क करता येईल :
जे.टी.ओ.(कॉम्प्लायन्स), केअर ऑफ वरिष्ठ उप-महासंचालक, दूरसंवाद विभाग मुंबई एल.एस.ए. 5 वा मजला, टेक्निकल कक्ष, साकी विहार टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, साकी विहार रस्ता, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072
ईमेल – jtoc.mb-dgt-dot@gov.in, दूरध्वनी – 022-28472605
दूरसंवाद विभागाच्या स्थानिक क्षेत्रीय कक्षाशी संपर्क करण्यासाठी सविस्तर माहिती दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://dot.gov.in/relatedlinks/director-general-telecom