नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०१४ मध्ये गायकवाडनगर भागात पार्किंगमधील लाईट बंद केली नाही या कारणातून वॉचमनला मारहाण करणा-या बापलेकास दोषी ठरवित जिल्हा व सत्र न्यायालयाने मुलास सहा महिन्यांचा सश्रम कारावास तर पित्यास दहा हजाराचा एक वर्षाकरीता चांगल्या वर्तणूकीचा बॉण्ड अशी शिक्षा सुनावण्यात आली. संदिप सिताराम साबळे (२५) असे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुलाचे नाव असून सिताराम विठ्ठल साबळे (५८ रा.दोघे मिलींदनगर,तिडके कॉलनी) यांच्याकडून चांगल्या वर्तवणूकीचा बॉण्ड घेण्यात आला.
याप्रकरणी परमेश्वर राजाराम खंदारे (२३ रा.बाफना हाऊस,गायकवाडमळा) या सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली होती. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन उपनिरीक्षक आर.डी.पवार यांनी गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एम गादिया यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अॅड.एस.आर.सपकाळे यांनी काम पाहिले.
लाकडी काठीने मारहाण
खंदारे बाफना हाऊस येथे वॉचमन म्हणून काम करीत असतांना ८ मार्च २०१४ रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. पार्किंगमधील लाईट बंद का केली नाही या कारणातून बापलेकाने कुरापत काढून त्यास लाकडी काठीने मारहाण करण्यात आली होती. या घटनेत वॉचमन खंदारे याच्या डाव्या खांद्यावर ब्लेडने वार करण्यात आले होते. तसेच डोक्यासही गंभीर दुखापत झाली होती.