नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्री करणा-यांवर पोलिसांनी कारवाई करत संशयिताच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश मधुकर गोसावी (४८ रा.प्रज्ञा हौ.सोसा.कोनार्क नगर) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. महामार्गावरील हॉटेल सयाजी पाठीमागे एक जण बेकायदा दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.७) रात्री छापा टाकण्यात आला असता संशयित पोलिसांच्या हाती लागला. तो ओमसाई गॅस वेल्डींग या दुकानाच्या पत्र्याच्या शेड बाजूला उघड्यावर दारू विक्री करीत होता. संशयिताच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा नावाचा देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई निखील वाघचौरे यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास जमादार वाढवणे करीत आहेत.
३० वर्षीय युवकाची आत्महत्या
३० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना पारिजातनगर भागात घडली. विशाल जयसिंग भिस्ट (रा.फ्लॅट नं.३ तुळशी अपा.पारिजातनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. विशाल याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल भिस्ट याने मंगळवारी (दि.७)दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत गौरव नामक तरूणाने नियंत्रण कक्षास माहिती दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.