नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळालीगावात भरधाव दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. सुजल उपेंद्रसिंग बुदेले (१९ रा.आनंद प्लाझा सोसा.महाजन हॉस्पिटल मागे) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. या अपघातानंतर दुसरा दुचाकीस्वार आपल्या वाहनासह पसार झाला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुदेले गुरूवारी (दि.१९) रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपून मुक्तीधाम भागात दूध पिण्यासाठी गेला होता. मुक्तीधाम भागातून तो आपल्या एमएच १५ जीपी २९४८ या दुचाकीवर घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. देवळाली गाव येथील राजवाडा भागात समोरून भरधाव येणाºया एमएच १५ जी डब्ल्यू ९८९४ वरिल चालकाने बुदेले याच्या ताब्यातील दुचाकीस धडक दिली. दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या अपघातात बुदेले गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुसºया मोटरसायकलवरील चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी सुजलचा भाऊ शुभम याने दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विंचू करीत आहेत.