नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. पहिला अपघात नाशिकरोड येथील बिटको चौकात झाला होता. लक्ष्मण दामू मानकर (७९ रा.चाडेगाव ता.जि.नाशिक) हे गेल्या २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजी पुतळयाकडून बिटको चौकाच्या दिशेने आपल्या मोपेड एमेच १५ एफएल १७११ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. नाशिकरोड पोलिस ठाणे समोरील मिस्त्री वाईन शॉपी समोर अज्ञात दुचाकीने मानकर यांच्या दुचाकीस धडक दिली होती. या अपघातात मानकर गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा सुनिल मानकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत. दुसरा अपघात एबीबी सर्कल जवळ झाला. त्र्यंबकरोडवरील अतुल नंदू कुमावत (२५ रा. देवी मंदिराजवळ,उत्कर्षनगर) हा तरूण सोमवारी (दि.२) रात्री एबीबी सर्कल कडून सीटीसेंटर मॉलच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ जीक्यू ६४२२ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एबीबी सर्कल येथील शहर वाहतूक शाखेच्या चौकी भागात भरधाव दुचाकीवरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली होती. या अपघातात कुमावत गंभीर जखमी झाला होता. डोक्यास दुखापत झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक किशोर पगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.