नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील निम्स हॅास्पिटमध्ये संतप्त वॉर्ड बॉयने महिला डॉक्टरवर कात्रीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. कामात हलगर्जीपणा केल्याचा जाब विचारल्याने त्यलाा राग आल्यामुळे त्याने हा हल्ला केला. या वॅार्ड बॅायने मानेवर सपासप वार करीत महिला डॉक्टरच्या पोटात कातर खुपसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे. डॉ.दराडे यांनी वेळीच आरडाओरड केल्याने अन्य कर्मचा-यांनी धाव घेतल्याने वॅार्डबॅाय पोलिसांच्या हाती लागला आहे. या घटनेनंतर गंगापूर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलसांनी संशयित वार्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. अनिकेत डोंगरे (रा.संतकबीरनगर,भोसला स्कूल मागे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत डॉ.सोनल अविनाश दराडे (रा.निम्स हॉस्पिटल) या जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी जखमी महिला डॉक्टरचे भाऊ सुखदेव आव्हाड (रा.गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित महिलेच्या गंगापूररोडवरील निम्स या हॉस्पिटल मध्ये वार्ड बॉय म्हणून कार्यरत आहे. कामात हलगर्जीपणा केल्याने डॉ. दराडे यांनी त्यास जाब विचारल्याने ही घटना घडली. रविवारी रात्री डॉ.दराडे या आपल्या कॅबीनमध्ये बसलेल्या असतांना संशयिताने दुपारी जाब विचारल्याचा राग मनात धरून हा हल्ला केला. डॉ.दराडे या आपल्या कॅबीनमध्ये एकट्या असल्याची संधी साधत त्याने हॉस्पिटलमधील धारदार कात्री सोबत घेवून जात त्यांच्यावर हल्ला केला. पाठीमागून मानेवर हल्ला करीत त्याने बचावासाठी उठलेल्या डॉ.दराडे यांच्या पोटात कात्री खुपसली. या घटनेत डॉ.दराडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पोटातून कात्री बाहेर काढण्यात आली असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अनिल पवार करीत आहेत.