नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महामार्गावरील दुर्गानगर भागात कपाटाची चावी बनविण्यासाठी घरी बोलाविलेल्या दोघांनी दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलकर (३३) व अमृतसिंग ओमकारसिंग सिकलकर (३९ रा.दोघे म्हाडा कॉलनी,एकतानगर नंदूरबार) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रियंका सत्यजित भामरे (रा.शिवम बंगला,केके वाघ इजि.कॉलेज मागे दुर्गानगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भामरे यांच्या घरातील कपाटाची चावी सापडत नसल्याने त्यांनी दोघा संशयितांना आपल्या घरी बोलावले होते. कुलूप दुरूस्ती आणि चावी बनविणारे दोघे मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास गल्लीतून आवाज देत जात असतांना त्यांना भामरे यांनी घरात घेतले होते. भामरे यांचे लक्ष नसल्याची संधी साधत भामट्यांनी बनावट चावीच्या आधारे कपाट उघडून रोकड व सोन्याचे दागिणे असा सुमारे ६० हजाराचा ऐवज लांबविला. ही घटना दोघे घराबाहेर पडल्यानंतर भामरे यांच्या निदर्शनास आली. भामरे यांनी संशयितांचा परिसरात शोध घेतला मात्र ते हाती लागले नाही. यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतल्याने पोलीसांनी दोघांना हुडकून काढले असून अधिक तपास पोलिस नाईक कंदिलकर करीत आहेत.