नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बनावट कागदपत्राच्या आधारे जातीचा दाखला काढणा-या विरुध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीची तक्रार उपविभागीय अधिका-यांच्या आदेशान्वये सेतू कार्यालय चालकाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण देवराज शंखबार असे संशयिताचे नाव आहे. याबाबत गणेश संजय शिंदे (रा.नवनाथनगर,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांचे मखमलाबाद शिवारात सेतू कार्यालय असून गेल्या १ जून २०१९ रोजी हा बनावट जातीचा दाखला वितरीत झाला आहे. संशयित अनुसूचित जाती जमातीचा नसतांना त्याने बनावट कागदपत्र सादर करून हा दाखला मिळविला. चौकशीत सदर व्यक्तीने खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आल्याने व शिंदे यांच्या सेतू कार्यालयाच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याने उपविभागीय अधिकाºयांच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.