नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्ही.एन.नाईक कॉलेज परिसरात जुन्या वादातून टोळक्याने एका विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला आहे. याप्रकरणी तमीर भोला शर्मा (१९ रा.अशोकनगर,सातपूर) या विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली असून चार जणांच्या टोळक्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव पाटील, वेदांत सोनवणे, ओम पवार व बाळा वडनेरे (रा.सर्व पवननगर,सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. शर्मा आणि संशयितांमध्ये पूर्ववैमनस्येचा वाद आहे. शनिवारी (दि.१०) वर्मा महाविद्यालयात गेला असता ही घटना घडली. महाविद्यालयाच्या आवारात संशयितांनी त्यास गाठून मागील वादाची कुरापत काढून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी त्यास जीवे मारण्याची धमकी दिली असून या घटनेत तो जखमी झाला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.