नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुना चेहडी मार्गावर भरधाव मालट्रकने सायकलला धडक दिल्याने चार वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडली आहे. अमित करंजीलाल दुर्वे (०४ रा.खर्जुल मळा,गाडेकर मळयाजवळ नाशिकरोड) असे मृत बालकाचे नाव आहे. बालक काकाच्या घरून वडिलांसमवेत डबलसिट सायकलवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. याप्रकरणी करंजीलाल विष्णू दुर्वे (रा.सदर) यांनी तक्रार दाखल केली आहे. दुर्वे सोमवारी (दि.५) दुपारच्या सुमारास मुलगा अमित यास सोबत घेवून परिसरात राहणारा भाऊ चरणसिंग दुर्वे यांच्या घरी गेले होते. साडे तीन वाजेच्या सुमारास दोघे बापलेक सायकलवर आपल्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. चिमुरडा अमित यास सायकलच्या पुढील दांड्यावर बसवून दुर्वे जुना चेहडी रोडने घराकडे जात असतांना गणपती मुर्ती कारखान्याच्या पत्र्याच्या शेडजवळ पाठीमागून आलेल्या ब्राऊन कलरच्या ट्रकने सायकलला धडक दिली. या अपघातात बापलेक रस्त्यावर पडले असता चिमुकल्या अमितच्या डोक्यावरून मालट्रकचे चाक गेले. त्यात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.