नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रॅव्हल्स कार बुकिंग करतांना पोलिस अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील २२ हजार ७६५ रूपयांची रोकड परस्पर लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास दौलतराव वाघ यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाघ शहर पोलिस दलात निरीक्षकपदावर कार्यरत आहे. वाघ यांना गेल्या २५ ऑगष्ट रोजी मुंबई येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स कार बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. भामट्यांनी संपर्क साधत वाघ यांना रेन्ट अ कार हे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. यावेळी वाघ यांनी करून इंडियन ट्रॅव्हल्स आणि एचटीटीपी ट्रॅव्हल्स नेट या वेबसाईटचा शोध घेतला असता त्यात बँकेच्या डेबीट कार्ड नंबर मागण्यात आला.
वाघ यांनी वेबसाईटवर डेबीट कार्ड टाकला असता त्यांना ओटीपी नंबर आला. या ओटीपी नंबरचा त्यांनी वापर केला असता भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील सुमारे २२ हजार ७६५ रूपयांची रक्कम परस्पर लांबविली. ही बाब लक्षात येताच वाघ यांनी बँकेशी संपर्क साधल्याने वेळीच व्यवहार थांबविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असून पोलिस अधिकाऱ्याच्या बाबतीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.









