नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बालपणाच्या मित्राची अडचण भागविण्यासाठी अल्पवयीन मुलीने घरातील सुमारे २० लाख ५० हजार रूपये किमतीचे दागिणे मित्राच्या स्वाधिन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. या अपहारप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गितेश कानडे असे दागिण्यांचा अपहार करणा-याचे नाव आहे. याबाबत खुटवडनगर भागात राहणा-या १६ वर्षीय युवतीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी व संशयित बालपणापासूनचे मित्र मैत्रीण आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात संशयित व त्याच्या मित्रांनी मुलीस गाठून कानडे अडचणीत असल्याचे सांगितले. यावेळी मुलीस विश्वासात घेत भामट्यांनी पैश्यांची नित्यांत गरज असल्याचे सांगून काही कालावधीसाठी दागिण्यांची मागणी केली. घरातील लाखोंचे दागिणे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी शोधा शोध केली असता ही घटना उघडकीस आली. मुलीच्या चौकशीत हा प्रकार समोर येताच पालकांनी पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी संशयिताविरोधात दागिण्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.