नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट मालक उभा करून हा दुस-याच्या मिळकत परस्पर खरेदी करण्याचे निदर्शनास येताच दस्त नोंदणी कार्यालयाने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिरज रमेश नन्नवरे, शितल कुमार पाटील आणि गुप्ता नामक इसम अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सह निबंधक शरद कचेश्वर दवंगे (रा.गायत्रीनगर,म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. दवंगे हे महामार्गावरील जय प्लाझा येथील सह निबंधक वर्ग २ या कार्यालयाचे काम पाहतात. गेल्या २१ ऑक्टोबर रोजी दवंगे हे आपल्या कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज पाहत असतांना संशयित धिरज नन्नवरे यांनी १६ लाख ६० हजारात खरेदी केलेल्या मौजे गंगाव-हे शिवारातील शेतजमिन गट नंबर ५३ -१-१ एकुण क्षेत्र ००.९७ या मिळकतीचे दस्त नोंदणीचे कागदपत्र त्यांच्या समोर आले. खरेदीची नोंदणी करतांना मुळ मालक असल्याचे भासवून संशयितांनी बनावट इसम उभा करून ही खरेदी केली. कागदपत्र तपासणीत मिळकतीचे मुळ मालक विदेशात वास्तव्यास असल्याचे समोर आल्याने दवंगे यांनी पोलिसात धाव घेतली असून तिघा भामट्यांविरोधात नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.