नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दाढेगाव येथे अंगणात कॉक्रीटीकरण केल्याचा जाब विचारल्याने संतप्त शेजारी दांम्पत्याने कुटूंबियास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत कु-हाड आणि दगड फेकण्यात आल्याने मामा भाचे जखमी झाले असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब तुंगार व अश्विनी तुंगार असे कुटुंबियास मारहाण करणा-या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष बाबुराव सोनवणे (रा.दाढेगाव ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केले आहे. संशयित तुंगार आणि तक्रारदार सोनवणे कुटुंबिय एकमेकांचे शेजारी राहणारे आहेत. तुंगार दांम्पत्याने शुक्रवारी (दि.११) आपल्या अंगणाबरोबरच सोनवणे यांच्या अंगणातही दगड व मुरूम टाकून कॉक्रेटीकरण केल्याने हा वाद झाला. सायंकाळच्या सुमारास काम सुरू असतांना सोनवणे व त्यांचा भाचा आशितोष साठे तुंगार दांम्पत्याला जाब विचारण्यासाठी गेले असता ही घटना घडली. संतप्त दांम्पत्याने मामा भाच्यास शिवीगाळ केली. यावेळी भाऊसाहेब तुंगार याने हातातील कु-हाड संतोष सोनवणे यांच्या डोक्यात मारून तर भाचा आशितोष साठे यास दगड फेकून मारल्याने दोघे मामा भाचे जखमी झाले असून यावेळी कुटूंबियास संपविण्याची धमकी देत दांम्पत्याने सोनवणे यांच्या आई व पत्नीलाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.