नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा शहरातील वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच वाहनांची काच फोडून गुरुवारी चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबईनाका आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत पुणे येथील अमोल तळेकर (रा.कोथरूड) यांच्या कारची काच फोडली. ते आपल्या मित्रांसमवेत गुरूवारी कामानिमित्त शहरात आले होते. लवाटे नगर येथील सीटी सेंटर मॉल भागात एमएच ११ बीएच ९६८४ पार्क करून ते मित्रासमवेत चहा पिण्यासाठी एका टपरीवर गेले असता चोरट्यांनी कारची पाठीमागील खिडकीची काच फोडून लॅपटॉप व गणेश निफाडे या मित्राची बॅग चोरून नेली. या बॅगेत हार्डडिक्स आणि महत्वाची कागदपत्र होती. या घटनेत भामट्यांनी ३३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर दोन घटना तिडके कॅालनी परिसरात घडल्या. या परिसरातील ई.एन.टी हॉस्पिटल भागात पार्क केलेल्या दोन महिला डॉक्टर आणि एकाच्या कारची काच फोडून चोरट्यांनी हाती लागेल ते पळवून नेले. एमएच १५ जीए ४०२० या कारची डाव्या बाजूची काच फोडून चोरट्यांनी अॅपल कंपनीचा लॅपटॉप,हॅण्डबॅग चोरून नेली. यात पाच हजाराची रोकड,सोन्याचे कानातले व महत्वाचे कागदपत्र होते. याप्रकरणी डॉ.सुनिता संकलेचा (रा.गोविंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. याच भागात डॉ.माधूरी वारूंगसे आणि सुमित नेरकर यांच्या पार्क केलेल्या कारच्याही काचा फोडून बॅगेतील महत्वाच्या कागदपत्रासह आठ हजार रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. तिन्ही घटनांमध्ये १ लाख ४६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.