महिलेच्या गळयातील ४५ हजाराचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्याने ओरबाडून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीत जाणता राजा कॉलनीत पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्याने ओरबाडून नेले. संगिता ठानसिंग पवार (रा.मैत्र गौरव अपा.राजपाल कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार या गुरूवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास राजपाल कॉलनीतून जाणता राजा कॉलनीकडे पायी जात असतांना ही घटना घडली. स्वामी समर्थ केंद्राजवळून त्या पायी जात असतांना अॅक्टीव्हावर आलेल्या भामट्याने जवळ येवून त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.
२९ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २९ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना चेतनानगर भागात घडली. आशिष विलास कदम (रा.रोहन अपा.चेतनानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. आशिषच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशिष कदम याने गुरूवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरातील बेडरूमध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत इनायत शहा यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.