घरात कुणी नसल्याची संधी साधत नोकराने दीड लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील मेघा सेक्टर भागात घरात कुणी नसल्याची संधी साधत नोकराने मालकाच्या घरातील दीड लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी संजय रामप्रकाश वर्मा (६१ रा.अशोकवन कॉलनी,मेघा सेक्टर) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन बेहदिया असे संशयित चोरट्याचे नाव आहे. वर्मा मंगळवारी सकाळच्या सुमारास वाहनास डिझेल भरण्यासाठी नजीकच्या पेट्रोल पंपावर गेले असता ही घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून घरगडी म्हणून काम करणा-या संशयिताने हे कृत्य केले. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने वर्मा घराबाहेर पडताच बेडरूममधील लाकडी कपाटाचे व टेबलच्या ड्रावरचे लॉक तोडून दीड लाखाची रोकड व लाखोंचे दागिणे चोरून नेले. ही बाब वर्मा घरी आल्यानंतर उघडकीस आली. अचानक नोकर बेपत्ता झाल्याने त्यांनी घराची तपासणी केली असता चोरीचा हा प्रकार समोर आला अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
>>>>>>>>
२० वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २० वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील हेडगेवार गार्डन भागात घडली. आकाश रामदास घोडके (रा.नवजीवन शाळे मागे,शिवशक्तीचौक) असे मृत युवकाचे नाव आहे. घोडकेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश घोडके याने मंगळवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ अनिल घोडके यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.