नाशिक : दोन महिलांच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याच्या दोन घटना शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या आहे. या चोरीप्रकरणी इंदिरानगर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना इंदिरानगर भागात घडली. सुमन दत्तात्रेय चव्हाण (७० रा.रथचक्र सोसा.) या वृध्दा बुधवारी सकाळच्या सुमारास भाजीपाला आणि फुले घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातून फुले व भाजीपाला घेवून त्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. वनसंपदा सोसायटी भागातील राजेंद्र बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांना आवाज देवून त्यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची डबल सरीची पोत हिसकावून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बरेला करीत आहेत. दुसरी घटना पंचवटी भागात घडली. येथील आशा उमेश कराड (रा.हनुमानवाडी) यांचे घर परिसरात महालक्ष्मी नावाचे किराणा दुकान आहे. कराड या बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने डेटॉल साबणाची मागणी करीत त्यांच्या गळयातील ९० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. कराड या साबन घेवून काऊंटरवर ग्राहकाला देण्यासाठी आल्या असता संशियताने हे कृत्य केले. दोघे भामटे पसार झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.