नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गांधीनगर भागात वृध्द महिलेच्या गळय़ातील दोन लाख रूपये किमतीचा सोन्याचा राणी हार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. देवदर्शन आटोपून पार्क केलेल्या कारच्या दिशेने जात असतांना चोरट्यांनी हा हार लंपास केला. या चोरीप्रकरणी रिता अशोक लोध (६३ रा.सह्याद्री कॉलनी,शेलार मळय़ा मागे,कॅनलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. लोध कुटुंबिय सोमवारी दुपारच्या सुमारास इंडिया प्रेस भागातील अटल बिहारी गार्डन परिसरात देवदर्शनासाठी गेले होते. दुर्गा पूजा मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या देवीचे दर्शन घेवून कुटुंबिय कार पार्किंगच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली. वृध्द रिता लोध या आपल्या कुटुंबियांसह कारकडे जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख ८० हजार रूपये किमतीचा सोन्याचा राणी हार ओरबाडून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.