नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड भागात गणेशोत्सवात झालेल्या वादातून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी बाळासाहेब नामदेव एखंडे (रा. टेंभे मळा, शेवगे दारणा रोड पळसे) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील देविदास गायखे, उमेश अरूण गायखे (रा.दोघे पळसे ता.जि.नाशिक) व त्यांचे चार साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेत लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने ५५ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला असून त्यांच्या हाताचे व पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. एखंडे रविवारी दुपारच्या सुमारास जावई रतन कासार यांच्या समवेत गंगापूररोड भागातील मीट अॅण्ड इट कॅफे परिसरात गेले होते. राम मंदिराजवळून सासरा जावई जात असतांना दुचाकीवर आलेल्या टोळक्याने गणेशोत्सवात झालेल्या वादातून लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. टोळक्याने सासरा जावईस शिवीगाळ व दमदाटी करीत, पळश्याला कमी मार बसला आता तुला दाखवतो असे म्हणत एखंडे यांना बेदम मारहाण केली. या घटनेत एखंडे यांचे हाताचे व पायाचे हाड मोडल्याने फॅक्चर झाले असून, अधिक तपास उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.