नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्याला ताब्यात घेऊन ९ लाख ३२ हजार ४०० रुपये किमतीचे ऐवज हस्तगत केले आहे. सीसीटीव्ही फुटेज बघून पोलिसांनी या घरफोडी करणा-या चोराला पकडले आहे. आलोक दत्तात्रेय सानप (वय २३, रा. मखमलाबाद) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
२७ सप्टेंबर रोजी मीरा शशिकांत गंभीरे (वय ५०, रा. ध्रुव नगर, गंगापूर शिवार, नाशिक) यांनी या घरफोडीची तक्रार दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, फ्लॅटमधून २४ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरी करून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या घरफोडीचा तपास सुरु करुन व आरोपीला ताब्यात घेतले. घराच्या मुख्य दरवाजाच्या लॉकची चावी चोरून त्या चावीने लॉक उघडून सदर संशयिताने हे दागिने लंपास केले होते.