नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात मंगळवारी रात्री नंदुरबार जिल्हयातील खापर येथून अटक करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातील संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणे आणि त्याचा सहकारी विवेक ठाकरे या दोघांना आज न्यायालयाने ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रुग्णालयातील लॅपटॉप आणि स्टॅम्प याचा तपास करण्यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती. पण, न्यायालयाने पुढील तपासासाठी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात आंतर जिल्हा बदलीसाठी १६ पोलीस अर्जदारांनी सादर केलेले अहवाल सदोष आढळल्यानंतर बनावट वैद्यकिय प्रमाणपत्राचे रॅकेट उघड झाले होते. याबाबत गुन्हा दाखल होताच पोलीस तपासात प्रभावती, साईछत्र गणेश मल्टी स्पेशलिस्ट या रुग्णालयाच्या नावाने बनावट अहवाल सादर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यापैकी साईछत्र हे रुग्णालय कोरोना काळापुरतेच सुरू राहिल्याची माहिती मिळाली होती. हे सर्व अहवाल डॉक्टर स्वप्नील सैंदाणे यांनी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला नंदुरबार येथून अटक करण्यात आली आहे. स्वप्निल सैंदाणे सोबतच या प्रकरणातील संशयित विवेक ठाकरे यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.