नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्दळीच्या चौकमंडई भागात रस्त्यात अॅटोरिक्षा पार्क केल्याने दोन गटात झालेल्या हाणामारीत कारचालकासह व्यावसायीक जखमी झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल कादीर (५५ रा.बिरबल आखाडा,चौकमंडई) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कादीर शनिवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास आपली चारचाकी घेवून घराकडे जात असतांना ही घटना घडली. बिरबल आखाडा येथील सर्व्हीस स्टेशन समोर दोन अॅटोरिक्षा भररस्त्यात लावलेल्या होत्या. शादाब पिरजादे,आयाज पिरजादे व मुज्जामील पिरजादे (रा.सर्व बिरबल आखाडा) आदींना अस्ताव्यस्त लावलेल्या रिक्षा बाबत विचारणा करून त्या काढून घेण्याचा सल्ला दिल्याने संतप्त संशयितांनी त्यांना मारहाण केली. कादीर यांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करून पायी घराकडे जात असतांना संशयितांनी जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने कारचालक कादीर जखमी झाले असून कादीर यांची पत्नी शाहील कादीर या आपल्या पतीच्या मदतीला धावून आल्या असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर मुज्जामील एजाज पिरजादे (रा.बिरबल आखाडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सहकार मटेरियल या दुकानात असतांना संशयित कादीर बेग,नईम बेग व शाईद बेग यांनी दुकानाबाहेर बोलावून घेत रस्त्यामध्ये लावलेल्या अॅटोरिक्षाबाबत विचारणा केली असता ती रिक्षा माझी नाही असे सांगितल्याने संशयित बापलेकांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याघटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने पिरजादे जखमी झाले असून यावेळी त्यांचे चुलत बंधू शादाब पिरजादे हे आरडाओरड झाल्याने मदतीला धावून आले असता त्यांनाही त्रिकुटाने बेदम मारहाण करीत जखमी केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे व पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.