नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टेक्स मॅसेजवरील लिंक ओपन करण्यास सांगून नोकरदारास पाच लाखाचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा मेसज ओपन करुन भामट्याने बँक खात्यातील पाच लाख अन्य खात्यावर वर्ग करुन घेतले. त्यामुळे पॅनकार्ड अपडेट करणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सतिश रामचंद्र कंकरेज (रा.कोनार्क नगर,आडगाव शिवार) यांनी तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंकरेज यांच्याशी गेल्या रविवारी (दि.४) भामट्यांनी संपर्क साधला होता. पॅनकार्ड अपडेट करण्याचा बहाणा करून भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर टेक्स मॅसेजच्या माध्यमातून एक लिंक पाठविली. सदरची लिंक कंकरेज यांनी ओपन केली असता त्यांच्या एसबीआय बँक खात्यातील पाच लाख रूपयांची रोकड भामट्यांनी अन्य खात्यात वर्ग केली. ही बाब निदर्शनास येताच कंकरेज यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.