नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– काठे गल्लीत राहणा-या डॉक्टरला सहा लाख रूपयांना एका भामट्याने गंडा घातला आहे. फार्मा कंपनीच्या वतीने दुबई येथे कॉन्फरन्ससाठी पाठविण्याचे सांगून ही फसवणूक केली आहे. फसवणूकीतील ही रक्कम युनियन बँकेच्या पश्चिम बंगाल येथील ग्राहकाच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. विशाल पाण्डेय (रा.दुर्गपूर,पं.बंगाल) असे संशयित बँक खातेधारकाचे नाव आहे. या फसवणूकप्रकरणी काठेगल्लीत राहणारे डॉ.गिरीश काळे यांनी तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २२ ऑगष्ट रोजी डॉ.काळे यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. ग्लेनमार्क या फार्मा कंपनीच्या वतीने दुबई येथील कॉन्फरन्ससाठी आपली निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येवून विविध आमिषे दाखविण्यात आले. याप्रसंगी डॉ.काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांना विमानप्रवासासह अन्य खर्चापोटी ५ लाख ७३ हजार ४५२ रूपयांची रक्कम संशयित पाण्डे याच्या युनियन बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. सलग तीन दिवस पाठपुरावा करीत भामट्यांनी पुन्हा विविध कारणे सांगून पुन्हा ८ हजार ४५९ रूपये उकळण्यात आले. ही रक्कम पेटीएम द्वारे स्विकारण्यात आले. त्यानंतर संपर्क तुटल्याने डॉ.काळे यांनी चौकशी केली असता फसवणुक झाल्याचे समोर आले. डॉ. काळे यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली असून पैसे वर्ग झालेल्या खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.