नाशिक – वडाळारोडवरील हिरवेनगर भागात घरासमोर पार्क केलेल्या कारचे सायलेन्सर चोरट्यांनी खोलून नेल्याची घटना घडली. सुनिल लक्ष्मण हिरवे (रा.लेवा समाज मंगल कार्यालयाजवळ,हिरवेनगर ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिरवे यांची एमएच १५ एचयू ५४२५ कार गेल्या सोमवारी (दि.८) रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या सायलन्सरचे नट खोलून सुमारे ३० हजार रूपये किमतीचे सायलेन्सर चोरून नेले. ही घटना दुस-या दिवशी उघडकीस आली. हिरवे घराबाहेर पडले असता त्यांनी कार चालू केली असता अचानक मोठा आवाज आल्याने त्यांनी तपासणी केली असता सायलेन्सर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलिस नाईक राजू शिंदे करीत आहेत.