नाशिक : नानावली भागात दोघा महिलांना अश्लिल शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. पोलिस तक्रारीचा वाद मिटविण्यासाठी घरी बोलावून घेत दांम्पत्याने धक्काबुक्की केली. सर्फराज पठाण व फरीदा पठाण (रा.दोघे नानावली मज्जीद जवळ) अशी महिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने नाशिक भागात राहणा-या पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पीडितेची व्याहीन असलेल्या महिलेच्या मुलाने नानावली भागात राहणा-या अल्पवयीन मुलीस पळवून नेले आहे. याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. हा वाद मिटविण्यासाठी संशयितांनी गेल्या सोमवारी (दि.१) सायंकाळी दोघा महिलांना आपल्या घरी बोलावले होते. यावेळी झालेल्या शाब्दीक चकमकीतून सर्फराज व फरीदा यांनी दोन्ही महिलांना अश्लिल शिवीगाळ करीत धक्काबुक्की व हाताच्या चापटीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.