नाशिक – नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मधून चोरट्यांनी तीन चंदनाच्या झाडांची चोरी केल्याची घटना घडली आहे. राज्यभरातून ट्रेनिंग साठी इथे अनेक फौजदार येत असतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला असतो. या अकॅडमीत चारही बाजूने सुरक्षा असते तर सर्वत्र पोलिसांचा विळखा आणि वावर असतो. असे असतांनाही येथे चोरी झाल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.
पोलीस अकादमीत असलेल्या कॅडेट मेसच्या पश्चिम भागात असलेल्या विहिरीजवळील भागातून चंदनाचे झाड बुंध्यापासून कापत चोरट्यांनी नेले आहे. या अगोदर देखील नाशिक शहरात बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरुन नेली होती. आता देखील पोलीस अकॅडमी मधूनच चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याने सुरक्षा आणि बंदोबस्त वर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अकॅडमीतून चोरट्यांनी चंदनाचे झाड बुंध्यापासून कापून नेले आहे. त्यामुळे चोरट्यांनीच आता पोलिसांना आव्हान दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पोलीस अकादमीतील चंदन चोरी प्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.