नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरातील शिवसैनिकांना १४९ च्या नोटीसा पाठवल्या आहे. मुख्यमंत्री हे दोन दिवसाच्या दौ-यावर नाशिक जिल्ह्यात येणार आहे. या दौ-यात नाशिक येथे कोणताही जाहीर कार्यक्रम अद्याप नाही. त्यातच नाशिक पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या नोटीसा बजावल्या आहे.
शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचा हा पहिलाचा नाशिक दौरा आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. याअगोदरच पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. आता त्यांनी या नोटीसा शिवसैनिकांना दिल्या आहे. शिंदेंच्या नाशिक दौरा वेळी शिवसैनिक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार होते. त्यापूर्वीच शहरात मनाई आदेश लागू करण्यात आले. त्यामुळे काल शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले. त्यानंतर निलेश कोकणे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यामुळे काहीसे वातावरण निवळले असले तरी पोलिसांनी मात्र खबरदारी घेतली आहे. दौऱ्यात अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.