दुचाकीस्वार महिलेचा अॅपेरिक्षाचालकाने केला विनयभंग, गुन्हा दाखल
नाशिक : दिंडोरीनाका भागात दुचाकीस्वार महिलेचा अॅपेरिक्षाचालकाने विनयभंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड भागातील पीडित महिला मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. काट्यामारूती पेट्रोलपंप ते दिंडोरीनाका दरम्यान शेजारून जाणा-या अॅपेरिक्षावरील चालकाने अश्लिल हावभाव करीत हे कृत्य केले. दिंडोरीनाका भागात वाहतूक कोंडीमुळे महिला थांबली असता चालकाने आपले वाहन दुचाकीजवळ आणून महिलेचा विनयभंग केला. या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. अधिक तपास रोहित केदार करीत आहेत.
……….
आयफोन दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिक : दिपालीनगर भागात रस्त्याने फोनवर बोलत जाणा-या तरूणाच्या हातातील महागडा आयफोन दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. मनोज अशोक सोनार (३१ रा.श्रीरामनगर,दिपालीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनार सोमवारी रात्री जेवण आटोपून आपल्या घर परिसरात मोबाईलवर बोलत फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. महादेव मंदिराजवळून ते फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचा आयफोन हिसकावून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक चेतन मार्तंड करीत आहेत.