नाशिक : शहरात वेगवेगळया भागातून स्कार्पिओसह दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी अंबड, भद्रकाली व सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाथर्डी फाटा येथील एस.के. गेस्ट हाऊस भागात स्कार्पिओ एमएच १५ एफ ५८३१ लावलेली असतांना चोरट्यांनी सोमवारी ती चोरून नेली. काठेगल्लीतील महेश पांडूरंग सावंत (रा.अमृतरत्ननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना मेन रोडवर घडली आहे. या चोरीप्रकरणी मयुरेश वसंत लोखंडे (रा.आनंदनगर,पाथर्डी ) यांनी तक्रार दाखल केली आहे. लोखंडे हे गेल्या बुधवारी मेनरोड भागात गेले होते. भगवंतराव हॉटेल भागात त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ बीझेड ७८८२ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत. तिसरी घटना जुने नाशिक भागात घडली. वडाळागावातील इसाक करीम शेख (रा.मेहबुबनगर) हे गेल्या शनिवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील सायंतारा हॉटेल भागात गेले होते. चिराग बिर्याणी समोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ एई ६५५१ पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.