नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये कारचालकासह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पहिल्या अपघातात कारच्या धडकेतदुचाकीस्वार ठार झाला तर दुस-या अपघातात भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला.
पहिला अपघात गंगापूररोडवर झाला. सातपूर औद्योगीक वसाहतीतील सलीम सत्तार खाटीक (५३ रा.मयुर अपा.एसबीआय बँके पाठीमागे अशोकनगर) हे रविवारी (दि.१९) आपल्या दुचाकीवर सावरगाव भागात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते सावरगाव गोवर्धन (गंगापूर) लिंकरोडने डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कानेटकर गार्डन जवळून ते आपल्या घराकडे जात असताना समोरून भरधाव येणा-या एमएच १५ एचजी २३४८ या चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात खाटीक गंभीर जखमी झाले होते. चुलत भाऊ हारून सरपोउद्दीन खाटीक यांनी त्याना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिस शिपाई बी.एन.गवळी यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
दुसरा अपघात मेरी लिंकरोडवर झाला. पराग नरेंद्र जोशी (३८ रा.जयहरी अपा.हिरावाडी) हे गेल्या शनिवारी आपल्या आयटेन कारने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. औदूंबर लॉन्स समोरील सिमेंटच्या कट्यावर भरधाव कार जावून आदळल्याने जोशी गंभीर जखमी झाले होते. या घटनेत कारचे मोठे नुकसान होवून त्यांच्या छातीस नाकातोंडास आणि डोक्यास कारच्या टेअरींगचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश माळवाळ यांनी दिलेल्या फियार्दीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.