नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागातील मंदिर परिसरातून दुचाकीस्वारांनी दोन महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना ध्रुवनगर भागात घडली. शकुंतला संजय अहिरे या रात्रीच्या वेळी देवदर्शन आटोपून महाकाली सुपर मार्केट जवळून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ५७ हजार रुपए किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
दुसरी घटना आसाराम बापू आश्रमाजवळ घडली. प्रतिभा प्रदीप जगताप (रा.बाप्पानगर,गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जगताप या महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (दि.१९) रात्री देवदर्शनासाठी आसाराम बापू आश्रम भागातील महादेव मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे पायी निघाल्या असता मंदिर परिसरात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली.