नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड भागात फुगे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अजय काळे (२१) असे फुगे विक्री करणाऱ्या मृत तरुणाचे नाव आहे. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील पखुरा येथील तो रहिवाशी आहे. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाहेर मोकळ्या जागेत हा खून झाला.
या घटनेत अजून एक जण जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. मृत अजयच्या छातीवर जखम असून त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळले. ही घटना घडल्यानंतर अजयला बिटको रुग्णालयात युवकाला उपाचारासाठी दाखल करण्यात आले. पण, ईसीजी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहे. सायंकाळी ही घटना घडली. फुगे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये आपापसात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्यांच्या हाणामारीत झाली. त्यातून ही घटना घडली.