नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्यावर नोटा उधळणे परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या अंगलट आले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा व सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी २५ ते ३० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक निवडणुक प्रक्रियेत परिवर्तन पॅनलचे ५४ उमेदवारांचे अर्ज निवडणुक निर्णय अधिका-यांनी न्यालयाच्या आदेशाचे कारण देत बाद केले. त्यामुळे संतप्त परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या अंगावर नोटांचा वर्षाव केला होता.
याप्रकरणी हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, श्याम गो-हाड, गंगाधर उगले, तानाजी गायधनी, विश्वास चौगुले, निवृत्ती अरिंगळे, आदेश पवार आदींसह २५ ते ३० साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
या तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझे सहकारी गुरूवारी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था या आपल्या कार्यालयात २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणुक प्रक्रियेचे शासकिय कर्तव्य पार पाडत असतांना हा प्रकार झाला. संशयितांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात जबरदस्तीने घुसून अश्लिल शिवीगाळ व दमदाटी करून दरवाजाची कडी लावून घेण्यात आली.
यावेळी अधिकारी कर्मचा-यांना कार्यालया बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. घेराव घालून बलसाने यांच्या सह महिलांच्या तोंडात नोटा कोंबण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा संशयितांनी मोबाईलवर व्हिडीओ बनवून तो समाज माध्यमात प्रसारीत करून शासकिय कामात अडथळा आणल्याचे नमुद केले आहे. अधिक तपास निरीक्षक आहिरे करीत आहेत.