नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर बसस्थानकाचा आता चेहरा बदलणार असून सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये असणारी व जगातील अग्रगण्य खाण आणि पायाभूत उपकरणे बनवणारी कंपनी एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड ने ही जबाबदारी उचलली आहे. कंपनीच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत एपिरॉकने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा सोबत हे सहकार्य करण्याचे ठरवले आहे. सातपूर बसस्थानक येथील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि आनंददायी अनुभव वाढवणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाचा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नुकताच शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ला नुकतीच गौरवशाली 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त सातपूर बस स्थानक परिसरात वड, पिंपळ, चिंच , आंबा अश्या देशी 75 झाडांचे रोपण करण्यात येऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत पुढील सुविधा सातपूर बसस्थानकाच्या परिसराच्या उभारल्या जाणार आहेत .
१. आकर्षक वॉल पेंटिंग द्वारे भिंती सुशोभित करण्याचा आणि बसस्थानकाच्या परिसराला अधिक आकर्षक आणि सर्वांसाठी आनंददायी बनवले जाणार
२. सोलर लाईट ची उभारणी
३.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
४.पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम
५.आरामदायी बाके
६.डस्टबिन
७.ड्रायव्हर-कंडक्टर रेस्टरूम सुविधा
सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व आणि समुदायासाठी प्रवासाचा अनुभव सुधारण्याची गरज ओळखून, एपिरॉक आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातपूर येथील बसस्थानक सुंदर करण्यासाठी एकत्र आले आहेत. सातपूर हे एक महत्त्वपूर्ण संक्रमण केंद्र आणि गजबजलेले औद्योगिक क्षेत्र असल्याने, सातपूर बस स्टॉपला प्रवासी आणि कर्मचारी या दोघांचीही मोठी गर्दी असते
या कार्यक्रमाला एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड चे महाव्यवस्थापक अरविंद पाटील, एचआर प्रमुख पल्लवी पांडे-फड, अनिरुद्ध माहुली, शिरीष नागमोती , युनियन चे अध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चे उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद , विभागीय नियंत्रक अरुण सिया , विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले , वरिष्ठ आगार व्यवस्थापक सौ. कल्याणी ढगे , इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
Nashik Satpur Bus Stand Modernization