प्रसिद्धी कधी कुणाच्या वाटेला येईल हे कुणी सांगू शकत नाही. येथील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या अरविंद सोनार यांची सध्या देशभरात चर्चा आहे. त्यांनी असे काय केले असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो. सर्वसामान्यपणे जीवन जगणाऱ्या सोनार यांची चर्चा का, हा प्रश्नही येतोच. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घेतलेली कोरोना प्रतिबंधक लस. पण, ही लस घेणारे ते काही पहिलेच आहेत. का, तर नाही. तरीही त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या अंगाला चिकटत असलेले चमचे, नाणी, ताटली यामुळे. सोनार यांचा दावा आहे की लसीचा दुसरा डोस घेतल्यामुळेच त्यांच्या अंगात चुंबकत्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच हे होते आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नीनेही त्यांच्यासमवेत लसीचा दुसरा डोस घेतला आहे पण पत्नीच्या अंगात चुंबकत्व निर्माण झालेले नाही. या बाबीची खात्री करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
काहींनी चमचा त्यांच्या खांद्यावर ठेवून पाहिला तर काहींनी त्यांच्या छातीवर ताटली ठेवून पाहिली. पण, या वस्तू खाली पडत नाहीत तर त्या अंगाला चिकटून राहत आहेत. त्यातही या वस्तू काही वेळासाठी अंगाला चिकटत नाहीत तर जोपर्यंत आपण त्या काढत नाहीत तोवर त्या अंगाला चिकटून राहत आहेत. त्यामुळे सहाजिकच या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. यासंदर्भात तज्ज्ञांना विचारले असता त्यांनीही हे गूढ असल्याचे म्हटले आहे. मात्र, लसीमुळे शरिरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने याप्रकरणी चौकशी व अभ्यास करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे यापुढील काळात विभागाकडून याचा अभ्यास केला जाईल आणि खरे कारण समोर येईल. तोपर्यंत सोनार यांना मात्र चांगलीच प्रसिद्धी मिळणार आहे.