जर ही पूर्तता केली नाही तर ग्रामंपचायतीचे सदस्य होऊ शकते रद्द

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
– राखीव जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात पडताळणी त्रुटींची पूर्तता करावी
– जात पडताळणी समितीने केले आवाहन
दिंडोरी – जिल्हयातील माहे जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये निवडून आलेल्या ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी त्यांचे अर्ज जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केलेले आहेत व ज्यांचे अर्जात काही त्रुटी आहे त्यांनी त्वरित ऑनलाईन पूर्तता करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे करण्यात आले आहे. अर्जदार यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जात प्रमाणपत्राअभावी आपले सदस्यत्व रद्द  होऊ शकते. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज १ -८२०२० पासून संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने सुरु झालेले आहे. जानेवारी, २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी त्यांचे अर्ज जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाईन पध्दतीने भरून या कार्यालयात सादर केलेले आहेत, व ते ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडून आलेले आहेत. अशा बऱ्याच उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन भरतांना आवश्यक कागदपत्र/मूळ पुरावे (प्रमाणित प्रती) अपलोड केलेले नाहीत. तरी अशा उमेदवारांना कागदपत्र अपुर्तततेबाबत त्यांनी ज्या ई-मेल आयडी मधून ऑनलाईन अर्ज भरलेला आहे व अर्ज ऑनलाईन भरतांना जो मोबाईल क्रमांक नोंदणी केलेला आहे. त्यावर त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. तथापि वारंवार ई-मेल/एसएमएस व्दारे कळवून देखील त्रुटी पुर्तता ऑनलाईनव्दारे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. कदाचित संबंधीत अर्जदार यांनी सेतु संचालक, सायबर कॅफे चालक अथवा अन्य कोणाच्यातरी ई-मेल/मोबाईल क्रमांक नोंदणी केला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्रुटी पुर्तता होत नाही. तरी अर्जदार यांनी याबाबत खात्री करून त्यांना कळविण्यात आलेली त्रुटीची पुर्तता तात्काळ ऑनलाईन करावयाची आहे. त्यासाठी समिती कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
निवडणुक निवडून आल्यानंतर अर्जदाराचा दावा सिध्द करण्याची जबाबदारी हीअर्जदार यांची असते. जर समितीसमोर वरीलप्रमाणे नमूद त्रुटी पुर्तता ऑनलाईन तात्काळ पुर्ण न केल्याने व अर्जदार यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जात प्रमाणपत्राअभावी आपले सदस्यत्व रद्द झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील याची नोंद घ्यावी अर्जदार उमेदवारांनी आपल्या अर्जाची ऑनलाईन खातरजमा करून जर त्रुटी असतील तर त्यांची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांचेकडून करण्यात आले आहे.