विशेष प्रतिनिधी, नाशिक
प्रसिद्धी कधी कुणाच्या वाटेला येईल हे कुणी सांगू शकत नाही. येथील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या अरविंद सोनार यांची सध्या देशभरात चर्चा आहे. त्यांनी असे काय केले असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो. सर्वसामान्यपणे जीवन जगणाऱ्या सोनार यांची चर्चा का, हा प्रश्नही येतोच. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घेतलेली कोरोना प्रतिबंधक लस. पण, ही लस घेणारे ते काही पहिलेच आहेत. का, तर नाही. तरीही त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या अंगाला चिकटत असलेले चमचे, नाणी, ताटली यामुळे. सोनार यांचा दावा आहे की लसीचा दुसरा डोस घेतल्यामुळेच त्यांच्या अंगात चुंबकत्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच हे होते आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नीनेही त्यांच्यासमवेत लसीचा दुसरा डोस घेतला आहे पण पत्नीच्या अंगात चुंबकत्व निर्माण झालेले नाही. या बाबीची खात्री करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.










