मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातून जाणा-या जुन्या आग्रा महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खड्डेमय असल्याने महापालिक प्रशासनाने त्याची दुरुस्ती केलेली नव्हती, अखेर मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी कार्यकर्त्यांसह या खराब रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या आयुक्त भालचंद्र गोसावी यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर चहा व पाणी फेकले. यावेळी जोपर्यंत काम सुरु होत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणारा नाही अशी भूमिका आमदार मुफ्ती यांनी घेतली. यावेळेस तातडीने काम सुरु करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला व रस्त्याचे काम सुरु करण्यास सुरुवात झाली.