मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक कलाकारांसोबत शूटिंगच्या वेळी काही वेळा अपघात देखील होऊ शकतो. खूप वर्षापूर्वी एका चित्रपटाच्या शुटींगप्रसंगी अभिताभ बच्चन यांना देखील असाच मोठा अपघात झाला होता. त्याचप्रमाणे अन्य कलाकारांना देखील अनेकदा विविध प्रकारच्या अपघातांना तोंड द्यावे लागले आहे. आताही असाच एक अपघात झाला आहे. शूटिंगसाठी मेकअप करतेवेळी चेहऱ्यासमोरच बल्ब फुटल्याने अभिनेत्री सारा अली खान जखमी झाली आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या स्टाईलमुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. सध्या ती इंदूरमध्ये चित्रपटाचे शुटींग करीत आहे. याचवेळी मेकअप रूममध्ये सारा अली खानच्या चेहऱ्यासमोरील बल्ब अचानक फुटला. या अपघातामुळे सारा अली खानच्या चेहऱ्यावरही किरकोळ जखमा झाल्या आहेत. अभिनेत्रीसोबतच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, तसेच सारा अली खाननेच इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हा प्रकार शेअर केला आहे.
मेकअप रूममधील दुर्घटनेशी संबंधित हा व्हिडिओ शेअर करताना सारा अली खानने लिहिले की, “माझी सकाळची सुरुवात अशी झाली.” यामध्ये ती तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत बोलताना दिसत आहे. त्यानंतर सारा अली खानची मेकअप आर्टिस्ट बाहेर निघून जाताच तिच्या चेहऱ्यासमोरील काचेचा बल्ब अचानक फुटला. या अपघातामुळे अभिनेत्री पूर्णपणे घाबरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर साराच्या चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.
बघा या दुर्घटनेचा हा व्हिडिओ
Insta Update| Via Sara’s insta story❤️#SaraAliKhan @SaraAliKhan pic.twitter.com/RFL5y2QSYU
— Sara Times🗞 (@Saratimes95) January 23, 2022
सारा अली खान ही अभिनेता विकी कौशलसोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये उपस्थित आहे. शूटिंगच्या ब्रेक दरम्यान सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांनी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतले. तसेच, इंदूरमधील काही ठिकाणांनाही भेट दिली. सारा अली खानचा हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘लुका छुप्पी’ या चित्रपटाचा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे.