कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील कणेरी मठ सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी येथे झालेल्या गायींच्या मृत्यूने या मठाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून मठाचे मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे नेमके काय प्रस्थ आहे, याबाबतची नवनवीन माहिती पुढे येऊ लागली आहे.
कणेरी मठ हे कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गालगत आहे. या मठाचे नाव श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ असून कणेरी मठ नावाने ओळखले जाते. येथे जगद्गुरू काडसिद्धेश्वर हेमांडपंती शिल्पकलेचे भव्य शिवमंदिर आहे. मुख्य म्हणजे या मठात सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रवेश आहे. हा मठ सर्वांसाठी खुला करणाऱ्या श्री मुप्पीन सिद्धेश्वर स्वामी यांना चालते-बोलते वेदान्त म्हटले जाते. विद्यमान स्थितीत या मठाची जबाबदारी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हाती आहेत. मठावर प्रामुख्याने लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. मात्र, येथे सर्वधर्मीय येथे दर्शन, पर्यटनासाठी येतात.
अदृश्य काडसिद्धेश्वरांनी केला विस्तार
कणेरी मठाला केवळ अध्यात्मिक केंद्रापुरते मर्यादित न ठेवता अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी विस्तार केला. त्यांच्या मार्गदर्शनात १९७७ मध्ये सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन स्थापना करण्यात आले. शिक्षण, पर्यटन, कृषी, ग्रामीण संस्कृतीचे संग्रहालय, गोशाळा, सांस्कृतिक उपक्रम, रुग्णालय सुरू करण्यात आले. येथे मोठी गोशाळादेखील आहे.
गोशाळेचे वैशिष्ट्य काय?
चारशे प्रकारच्या देशी गायी असलेल्या कणेरी मठातील गोशाळेत गाईपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण; गोमूत्रापासून विविध पदार्थ मठात तयार केले जातात. येथील पशुपालक ‘गायो विश्वस्य मातरम्’ अशा घोषवाक्य असलेल्या टोप्या घालून असतात. येथील पंचमहाभूत महोत्सवात गोसंवर्धनावर विशेष भर दिला जात आहे.
काय आहे राजकीय कनेक्शन?
कणेरी मठाचे विविध राजकीय पक्षातील बड्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध राहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, हिंदुत्ववादी संघटनाच्या प्रतिनिधींचा येथील वावर मागील काही वर्षांत वाढला आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे लोकसभेचे भावी उमेदवार असल्याचेही सांगण्यात येते.
Kolhapur Kaneri Math and Siddheshwar Swami