इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन क्षेत्र किंवा बॉलीवूडची क्रेझ लोकांमध्ये एवढी आहे की, प्रत्येक व्यक्तीला इथे येऊन आपलं करिअर करायचं असतं. याच नादात अनेकजण या इंडस्ट्रीत येतात. त्यातले अनेकजण इथे टिकतात तर काहीजण काही काळ राहून मग यातून बाहेर पडतात. असंच काहीसं या अभिनेत्रीबद्दल झालं. करिअर चांगलं सुरू होतं. पण, तिने घेतलेला एक निर्णय तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेला. आणि आता तिला तिच्या निर्णयाचा पश्चात्ताप होतो आहे. ही गोष्ट आहे, अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची.
पाकिस्तानी वडील आणि ख्रिस्ती आईच्या पोटी नर्गिसचा जन्म झाला. त्यामुळेच बहुधा नर्गिस स्वतःला ‘ग्लोबल सिटीझन’ मानते. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी म्हणून ती भारतात आली. त्यानंतर इथल्या रितीरिवाजांचा, संस्कृतीचा परिचय होत गेला. आज माझी गणपतीवर अतोनात श्रद्धा आहे. गौतम बुद्धांच्या आयुष्याचा माझ्यावर खूप प्रभाव असल्याचे नर्गिस सांगते.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच पॉकेटमनी मिळवण्यासाठी नर्गिसने मॉडेलिंग सुरू केलं आणि नंतर याच व्यवसायाची आवड निर्माण झाली. त्या काळात अमेरिकन रिऍलिटी शो ने नर्गिसला प्रसिद्धी दिली आणि भरभरून कामही दिलं. भारतात मी आले तेही कामानिमित्तानेच. ‘किंगफिशर’ कॅलेंडरचं फोटोशूट झालं आणि मी लाईम लाईटमध्ये आले. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते ‘रॉकस्टार’ या त्यांच्या हिंदी चित्रपटाची तयारी करत होते. या सिनेमासाठी त्यांनी मला रणबीर कपूरची नायिका म्हणून मुख्य भूमिका दिली. चित्रपट मिळाला तेव्हा मला हिंदी भाषेचं अजिबात ज्ञान नव्हतं. खूप चुका व्हायच्या. पण, मी जिद्दीने इथे टिकून राहिले. पण कालांतराने बॉलीवूड म्हणजे ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे याची जाणीव झाली, आणि मी इथे हळूहळू रुळू लागले. ‘रॉकस्टार’ नंतर मला अनेक चित्रपट मिळाले.
हिंदी सिनेमात एका पाठोपाठ काम करत होते, कधी कधी वर्षभरात एकही ब्रेक मी घेतला नाही. झपाटून काम करत होते. पण, इंडस्ट्रीत दहा वर्षे झाली आणि काय झालं माझं मलाच कळलं नाही आणि मी करिअरमधून ब्रेक घेण्याचं ठरवलं. आणि मी माझ्या आगामी फिल्म्सच्या प्रॉडक्शन हाऊसेस -काही निर्मात्यांना एक मेल केला. थेट अमेरिकेची फ्लाईट पकडून न्यूयॉर्क गाठलं. माझ्या हक्काच्या घरात गेल्यावर माझं अस्वस्थ मन शांत झालं. ध्यानधारणा, स्विमिंग, योग, स्क्वॉश अशा अनेक गोष्टींमध्ये मी मन रमवलं. आज विचार करते तेव्हा वाटतं, तेव्हा मला ब्रेक घ्यायची दुर्बुद्धी का झाली असावी? हा तर वेडेपणाच होता.
याच काळात लॉकडाऊन लागलं. आणि एका आगामी फिल्मच्या शूटिंगसाठी भारतीय दिग्दर्शक अजय वेणूगोपालन न्यू जर्सीला येणार असल्याची माहिती मला मिळाली, मी त्यांना न्यू जर्सीलाच भेटले. ‘शिव शास्त्री बलोबा’ ही त्यांची कथा भारतीय, पण अमेरिकेत येऊन कुचंबणा झालेल्या माणसाची होती. मध्यवर्ती भूमिका नव्हती, पण मला पुन्हा संधी हवी होती. आणि नेमका तो २०२१ चा लॉकडाऊनचा काळ होता. मी स्वतःहून त्यांना भेटल्याचं त्यांना समाधान वाटलं, बजेट फार कमी आहे असंही ते म्हणाले. पण मला बजेटची पर्वा नव्हतीच. मी होकार दिला. शिवाय मला अनुपम खेर, नीना गुप्ता अशा दिग्गजांसोबत काम करता येणार होतं. लॉकडाऊनमध्येच अमेरिकेत फिल्मचं शूटिंग सुरु झालं. या चित्रपटाने मला पुन्हा एक संधी दिली होती. अनुपम खेर आणि नीना गुप्ता या दोघांनीही माझी कानउघाडणी केली. सोन्यासारखं करियर सुरु असतांना पुन्हा गायब होऊ नकोस असा सज्जड दम दिला.
Actress Nargis Fakhri on that Truth Says