नवी दिल्ली – आतापर्यंत शाळांमध्ये खेळाच्या मैदानात बास्केरबॉल, टेनिसबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल हे खेळ खेळताना पाहिले गेले आहे. पण लवकरच दिल्लीतील सरकारी शाळांच्या छतांवर विद्यार्थ्यांना हे खेळ खेळता येणार आहेत. दिल्ली सरकारकडून अत्याधुनिक शाळा बांधल्या जात आहेत. या शाळांच्या छतावर विद्यार्थ्यांसाठी बास्केटबॉल कोर्ट, टेनिस आणि व्हॉलिबॉल कोर्ट असणार आहेत. या शाळा जागतिक दर्जाच्या असाव्यात या दिशेने काम सुरू झाले असून, आधुनिक आणि सर्व सोई-सुविधांनी युक्त असणार आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी मेहराम नगरमधील स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सिलेंसचे कोनशिला अनावरण केले. या शाळेच्या बांधकामाला ३९.७३ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, तिचे काम एका वर्षात पूर्ण होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने या शाळेच्या नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शाळेच्या अभ्यासासह खेळांकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी या वेळी सांगितले.
ही आहेत वैशिष्ट्ये
शाळेमध्ये शानदार सेमी ओलिम्पिक जलतरण तलाव तयार करण्यात येणार आहे. शाळेत डिजिटल शिक्षणासाठी ५२ स्मार्ट वर्ग असतील. तांत्रिक सुविधा आणि साधनांनी युक्त ८ प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहेत. शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. एक हजार प्रेक्षक बसतील या क्षमतेचे एम्पिथिएटर तयार करण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी युक्त ऑडिटोरियम असेल. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्या परिषदांसाठी या ऑडिटोरिअमचा वापर करता येणार आहे. जागतिक दर्जाचे इनडोअर स्पोर्ट्स एक्टिव्हिटी सेंटर असेल.