इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आधुनिक काळात सोशल मीडियाचा प्रभाव अधिक आहे. सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड येईल आणि काय ट्रोल होईल याचा अजिबात भरवसा नाही. आता हेच पहा ना! भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी ‘काला चष्मा’ या गाण्यावर एक रील केले आहे. हे रील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रावर चित्रीत झालेले ‘काला चष्मा’ हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसते आहे. यामुळे हे गाणे तब्बल ६ वर्षांनी चर्चेत आले आहे. हे गाणे लिहणाऱ्याला ते एवढे चालेल याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे त्याला या गाण्याच्या मानधनापोटी एवढे ११ हजार रुपये देण्यात आले होते.
‘काला चष्मा’ हे गाणे २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘बार – बार देखो’ या चित्रपटातील आहे. सिद्धार्थ मल्होत्रा व कतरीना कैफ यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर देखील या गाण्याने चांगलीच धूम केली होती. पार्टी, डान्स यामध्ये हे गाणं वाजणारच आणि मग अनेक जण काळा चष्मा घालून यावर आपला भन्नाट डान्स सादर करणार असे समीकरण आहे. मात्र सर्वांवर एवढी जादू करणारे ‘काला चष्मा’ हे गाणं कोणी लिहिलंय असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. नुकतंच याचे उत्तर समोर आलं आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘काला चष्मा’ हे गाणे एका पोलिसाने लिहिले आहे. पंजाब पोलिसातील हेड कॉन्स्टेबल अमरिक सिंह शेरा हे या गाण्याचे लेखक आहेत. कपूरथला जिल्ह्यातील इंटर सर्व्हिस ट्रेनिंग सेंटरमध्ये पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल अमर सिंग शेरा यांनी लिहिलेले ‘काला चष्मा’ गाणं जगभरात नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. हे गाणं त्यांनी १९९० मध्ये शिक्षण घेत असताना लिहिले होते. त्यावेळी ते अवघ्या १५ वर्षांचे होते.
अमरिक यांच्या परवानगीनंतर ‘बार बार देखो’ या चित्रपटात हे गाणं वापरण्यात आले आहे. त्यावेळी ‘काला चष्मा’ या गाण्यासाठी अमरिक यांना फक्त ११ हजार रुपये मिळाले होते. पण काही वर्षांनी हे गाणे इतके हिट होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. ‘काला चष्मा’ या गाण्यावर अनेक कलाकार, क्रिकेटपटू ते सर्वसामान्य नागरिक रिल व्हिडीओ बनवताना दिसत आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या गाण्याचीच चर्चा दिसते आहे.
Katrina Kaif Song Kala Chashma Writer Fact