नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा दरात सातत्याने घसरण होत असल्यामुळे शेतक-यांमध्ये संताप आहे. आज लासलगाव पाठोपाठ नांदगाव येथे लिलाव बंद पाडून आंदोलन करण्यात आले. पण, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी रयत क्रांती संघटनेने अनोखे आंदोलन केले. या संघटनेच्या सहा पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अगोदर त्यांनी निवेदन देऊन त्यांच्या समोरच खाली बसत कांदा फोडून कांदा-मिरची-पोळी खाऊन आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर जोपर्यंत भावाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला त्यामुळे त्यांचे हे आंदोलन चांगलेच चर्चेत आले.
हे आंदोलन सुरु झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर फोनाफोनी सुरु झाली. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पगार यांना पालकमंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. भुसे यांनी पदाधिका-यांना मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली जाईल आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
गेल्या काही दिवसापासून कांदा दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यात रास्ता रोको, लिलाव बंद पाडणे यासारख्या घटनाही रोजच होत आहे. पण, या सर्व आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे शेतक-यांचा संताप वाढत आहे.