कळवण – कळवण नगरपंचायतच्या प्रभाग क्र ११ व १२ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज माघारदिनी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यामुळे प्रभाग क्र ११ मध्ये भाजपा व अपक्ष उमेदवाराने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सौं हर्षदा जयेश पगार तर प्रभाग क्र १२ मध्ये काँग्रेसचे तेजस पगार यांची बिनविरोध निवड झाली. आमदार नितीन पवार, प्रगतशील शेतकरी घनश्याम पवार, गटनेते कौतिक पगार काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश पगार, नगरसेवक अतुल पगार यांची शिष्टाई यशस्वी ठरल्यामुळे चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या दिशेने पडला.
याअगोदर कळवण नगरपंचायतच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौं सुनीता पगार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे १४ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान झाले. प्रभाग क्र ११ व १२ या दोन्ही प्रभागासाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार होते. तत्पूर्वी माघार दिनी भाजपा उमेदवाराची नाट्यमय माघार आणि चिठ्ठीचा कौल मान्य झाल्यामुळे दोन्ही जागा बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना यश आले.
प्रभाग क्र ११ ची निवडणूक चुरशीची करण्यासाठी कळवण शहरातील अनेक नेत्यांनी नाट्यमय घडामोडी घडविल्यामुळे राष्ट्रवादीकडून सौं हर्षदा पगार, भाजपाकडून वर्षाली पगार अपक्ष सौं भारती शिंदे यांनी नामनिर्देशन केल्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे या प्रभागात मतदारांना पुन्हा लक्ष्मी दर्शनाची आस लागली होती. लाखो रुपयांची उलाढाल होण्याची मतदारांमध्ये चर्चा असतांना माघार दिनी दोन्ही उमेदवारांमध्ये समेट घडवून आणल्यामुळे भाजपाच्या सौं वर्षाली पगार यांनी अखेरच्या क्षणी माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौं हर्षदा पगार बिनविरोध झाल्या. गेल्या निवडणुकीत या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक जयेश पगार हे अवघ्या एका मताने विजयी झाल्यामुळे एका मतांची किंमत त्यांनी अनुभवली होती.बिनविरोध निवडीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
प्रभाग क्र १२ मध्ये राष्ट्रवादीचे छत्रसाल पगार व काँग्रेसचे तेजस पगार यांच्यात दुरंगी लढतीचे चित्र होते.आमदार नितीन पवार,नवीबेजचे प्रगतशील शेतकरी घनश्याम पवार गटनेते कौतिक पगार, माजी सभापती अशोक पगार, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश पगार, भूषण पगार,माणिकराव पगार, साहेबराव पगार, अतुल पगार,प्रशांत पगार, राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रसाल पगार, काँग्रेसचे तेजस पगार यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा घडवून आणली.
दोन्ही उमेदवार नात्यागोत्यातील असल्यामुळे
निवडणुकीच्या निमित्ताने होणारी उलाढाल, स्नेह, नातेसंबंध यांच्यात दुरावा होऊ नये असे मत बैठकीत नोंदवल्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये अटी शर्थीसह समेट घडवून बिनविरोध निवडीचा पर्याय पुढे ठेवून चिठ्ठीचा कौल मान्य झाल्यामुळे बैठकीत चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या दिशेने पडल्यामुळे राष्ट्रवादीच्या छत्रसाल पगार यांनी माघार नोंदवली.कळवण शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तेजस पगार यांची बिनविरोध निवड होऊन काँग्रेसने खाते उघडले.