इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याचा निकालही जाहीर झाला नाही आणि टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आता अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की अहमदाबाद कसोटीचा निकाल न लागता भारत अंतिम फेरीत कसा पोहोचला? टीम इंडियाची समीकरणं काय होती?
वास्तविक, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ होता. दरम्यान, इंदूरमध्ये खेळली गेलेली तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. इथून समीकरण बदललं. ते असे होते
अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील विजयामुळे भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल
अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा तो सामना अनिर्णित राहिला, तर अडचणींचा सामना करावा लागेल.
पराभव झाल्यास त्याला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
अशा स्थितीत न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किमान एका सामन्यात श्रीलंकेचा पराभव करावा, अशी भारताची इच्छा आहे.
इंदूर कसोटीनंतर गुणतालिकेत काय स्थान होते? हे पहायला हवे. इंदूरमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे गुणतालिकेत ६८.५२ टक्के झाले होते. पराभवानंतर टीम इंडियाला 60.29 टक्के गुण मिळाले होते.
न्यूझीलंडची मदत
एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अहमदाबादमध्ये खेळली जात आहे आणि दुसरीकडे न्यूझीलंडने श्रीलंकेचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. त्यांनी भारताचे समीकरण सोपे केले. श्रीलंकेचा पराभव होताच टीम इंडियाचा मार्ग मोकळा झाला. या समीकरणानुसार लंकेचा संघ एक कसोटी गमावल्यानंतर शर्यतीतून बाहेर पडला होता. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीत भारत हरला किंवा ड्रॉ झाला तरी फरक पडणार नाही.
श्रीलंकेच्या पुढील विजयाचे काय?
पुढच्या कसोटीत श्रीलंकेच्या विजयाचा समीकरणात काहीही परिणाम होणार नाही. क्राइस्टचर्चमधील पराभवानंतर श्रीलंकेने पुढची कसोटी जिंकली तरी त्याला केवळ 52.78 टक्के गुण असतील. भारताने अहमदाबाद कसोटी गमावली तरीही हे भारताच्या 56.94 टक्क्यांपेक्षा कमी असेल. जर टीम इंडियाने ही टेस्ट ड्रॉ केली तर त्याला 58.80 टक्के गुण मिळतील. ऑस्ट्रेलिया आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तो हरला तरी तो ६४.९१ टक्के गुणांसह अंतिम फेरीत पोहोचेल.
Indian Cricket Team in WTC Final How